सम्राट ग्रुपच्या वतीने शिवजयंती साजरी, पावनखिंड चित्रपटातील कलाकार उपस्थित

573 0

पुणे- सम्राट ग्रुपच्या वतीने श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असलेल्या ‘ पावनखिंड’ या चित्रपटातील कलाकार यावेळी उपस्थित होते. गणेश बिडकर यांनी या शिवजयंतीचे आयोजन केले होते.

गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उत्सवांवर बंधने आली होती. शिवजयंतीवर देखील निर्बंध होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने काही बंधने देखील कमी केले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते या उत्सवाचे उद्घाटन झाले.

यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा देऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ‘दिल्लीला देखील मोह झाला असे स्वराज्य छत्रपती शिवरायांनी निर्माण केले. शत्रूने २६ वर्षे प्रयत्न करूनही महाराजांनी स्वराज्याला धक्का लागू दिला नाही’ हेच राष्ट्रभक्तीचे विचार पुढील पिढी पर्यंत पोहचविण्याची आज गरज आहे, असे मत शहराध्यक्ष मुळीक यांनी व्यक्त केले.

पावनखिंड चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणारे अजय पुरकर, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे व काश्मीर फाईल फेम चिन्मय मांडलेकर, सिद्धी जोहरची भूमिका साकारणारे समीर धर्माधिकारी, मातोश्री गौतामाई देशपांडे यांची भूमिका करणाऱ्या माधवी निमकर, कोयाजी बांदल यांची भूमिका निभावणारे अक्षय वाघमारे, फजल खान साकारणारे सुश्रुत मनकनी, लेखक दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, संगीतकार देवदत्ता मनीषा बाजी, रिल्स स्टार हिंदवी पाटील यांच्यासह चित्रपट कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजय नाईक, विशाल दरेकर उपस्थित होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!