पुणे- १३ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेच्या स्वच्छतागृहात अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार झाल्याच्या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे.
पुण्यात एका १३ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओळख असल्याचा बहाणा करून एका अज्ञात व्यक्तीने पीडित विद्यार्थिनीला ढकलत एका नामांकित शाळेतील बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर या मुलीने आपल्या मैत्रिणीला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षिकांच्या कानावर ही घटना टाकली. त्यांनी मुलीच्या आईला व पोलिसांना बोलावून याची माहिती दिली.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या माथेफिरु व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपीचे रेखाचित्र पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे. या रेखा चित्राच्या माध्यमातून पोलीस या नराधमाच्या शोध घेत आहेत.