मुंबई : काँगेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन हा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचा एक फुटणार असल्याच्या चर्चा आहेत.
तसंच अशोक चव्हाणही पक्षात नाराज असून वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं. सध्या अशोक चव्हाण हे नॉट रिचेबल आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजत आहे. अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. मिलिंद देवरा आणि बाबा सिद्धीकी यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवास
अशोक चव्हाण हे महाराष्ट्रातल्या राजकारणातील मोठं नाव आहे. मराठवाड्यातील काँग्रेसचा ते चेहरा आहेत. नांदेड जिल्ह्यातील राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहेत. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तर अशोक चव्हाण यांनीही राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला हता. त्यानंतर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली.