पुणे : आशिष देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातलं सातत्यानं चर्चेत असलेले नाव. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) आज पुन्हा एकदा भाजपावासी झाले असून केंद्रीय मंत्री, नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. नेमका आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय पाहुयात…
काही दिवसांपूर्वी आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपाची दखल काँग्रेसकडून घेण्यात आली. यानंतर पक्षाकडून त्यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली होती मात्र त्यानंतरही आशिष देशमुख सातत्याने काँग्रेस नेतृत्वावर टीका करत राहिले यामुळेच त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच आशिष देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून ते भाजपावासी झाले आहेत.
विधानसभा अध्यक्ष सरकारला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षाचा सभात्याग VIDEO
आशिष देशमुख यांचा राजकीय प्रवास
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे आशिष देशमुख (Ashish Deshmukh) हे पुत्र आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांचे पुतणे.काटोल मतदारसंघातून 2014 ते 2019 या कालावधीमध्ये ते भाजपाचे आमदार होते. पुढं फडणवीस यांच्याशी विदर्भ विकासाच्या मुद्द्यावर मतभेद झाले. ऑक्टोबर 2018 मध्ये त्यानी काटोल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन वर्धा येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये काँग्रेसमध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या विरोधात निवडणूक लढवली. ज्यात त्यांना 59893 मते मिळाली. पण त्यांचा 49344 मतांनी पराभव झाला. दरम्यान आता आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्या भाजपा (BJP) प्रवेशनात पुन्हा एकदा काटोल मध्ये काका पुतण्यांची लढत पाहायला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.