पुणे : मी लहान असताना पुणे शहर जसं होत तसं आज राहिलेलं नाही, खूप पुढे गेलं आहे. मी लहान असताना गणेशोत्सवात कॉलनीतील मंडळाच्या स्टेजवर परफॉमन्स करायची,आपल्याला कुठे तरी चांगले स्टेज मिळावे,आपण जे करतोय त्याला एक्सपोजर मिळावे असे वाटायचे, मात्र आपल्या क्षमता दाखवता येतील असे प्लॅटफॉम नव्हते,आज पुण्यातील स्त्रिया जे काही करत आहेत ते बघून कौतुक वाटते, असे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी व्यक्त केले.
महिला सक्षीकरणासाठी आयोजित “मिस अँड मिसेस इंडिया एमपॉवर्स 2023” या स्पर्धेचा ग्रँड फिनाले पुणे येथील ऑर्किड हॉटेल येथे पार पडला यावेळी अमृता खानविलकर बोलत होत्या. याप्रसंगी स्पर्धेच्या संस्थापक – संचालक आणि प्रस्तुतकर्त्या डॉ. भारती पाटील, इंटरनॅशनल ग्रुमर पायल प्रामाणिक,स्पर्धेच्या नॅशनल पेजंट ऍडवायझर डॉ. संगीता गायकवाड, नॅशनल पेजंट को-ऑर्डिनेटर नेहा रोकडे, ‘ब्रँडनीती मीडिया’च्या डायरेक्टर नूतन जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अमृता खानविलकर म्हणाल्या, आजच्या स्पर्धेत 12-13 वर्षांच्या मुलींपासून 65 वर्षांच्या आजीबाईंनी सहभाग घेत जो कॉन्फिडन्स दाखवला त्याला तोड नाही, स्पर्धक मुली,महिलांचे कौतुक करावे तितके कमी आहे. विशेष म्हणजे या पेजंटचे जे चार स्तंभ आहेत त्या सर्व महिला आहेत ही बाब या स्पर्धेचे वेगळेपण आहे,असे मला वाटते असेही खानविलकर यांनी नमूद केले.
महिला सक्षमीकरणासाठी डॉ. भारती पाटील प्रस्तुत “मिस अँड मिसेस इंडिया एमपॉवर्स 2023” दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांच्या द्वारे समर्पित हि स्पर्धा नॅशनल पेजंटचे सर्व नियम पाळून चार दिवसांसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे अनेक वैशिष्ट्य आहे. त्यापैकी काही वैशिष्ट्ये म्हणजे या सौंदर्य स्पर्धेने महिला सक्षमीकरणावर भर दिला. या स्पर्धेच्या मंचावर महत्त्वाच्या भूमिका साकारणार-या व्यक्ती या मोठ्या प्रमाणात महिलाच होत्या. डायरेक्टर पॅनेलवर सर्व महिलाच होत्या. ही स्पर्धा चार दिवसांची होती. यामध्ये ग्रुमिंग सेशन, टॅलेंट राऊंड, ब्रायडल, गोल्डन सिक्वेंस राऊंड घेण्यात आले. या स्पर्धेचे एकूण 4 टायटल होते, ‘टिन, मिस- मिसेस आणि एमआरएस.’ स्पर्धेच्या ऑडिशनच्या वेळी ‘गिनिज बुक’च्या टीमला विशेष निमंत्रण होतं आणि फिनालेमध्ये देखील त्यांनी त्यांची विशेष उपस्थिती दर्शवून संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आणि सर्वांचे कौतुक केले.