पुणे- कोरोना काळ व लॉकडाऊन नंतर प्रथमच ‘पीएमपी’चे उत्पन्न आणि प्रवासी संख्या पूर्वपदावर येत आहे. २०२० नंतर पहिल्यांदाच दैनंदिन प्रवासी संख्या ९ लाखांहून अधिक तर उत्पन्न दीड कोटींच्या पुढे गेले आहे. अशी माहिती मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली आहे.
लॉकडाऊनपूर्वी २४ फेब्रुवारी २०२० ला ‘पीएमपी’ला मिळालेले उत्पन्न १ कोटी ५० लाखांपेक्षा जास्त होते. त्यानंतर जवळपास २ वर्षांनी पीएमपीची दैनंदिन प्रवासी संख्या ९ लाखांपर्यंत पोहोचली असून १४ फेब्रुवारी २०२२ रोजी एकूण १५४७ इतक्या बसेस संचलनात होत्या. तसेच या दिवशी महामंडळाला १ कोटी ५० लाख २२ हजार ३२६ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.
कोरोनामुळे ‘पीएमपी’चे बस संचलन अत्यावश्यक सेवा वगळता २ सप्टेंबर २०२० पर्यंत पूर्णपणे बंद होते. ३ सप्टेंबरपासून बससेवा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर एप्रिल ते मे दरम्यान ‘पीएमपी’ला पुन्हा बस बंद ठेवाव्या लागल्या. दोन्ही लॉकडाऊननंतर पीएमपीकडून बस सुरु करण्यात आल्या. बससेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे असे वाटत असतानाच ओमिक्रॉनचा संसर्ग वाढल्याने १० जानेवारी २०२२ पासून बस संचलनात पुन्हा कपात करावी लागली होती.
मात्र, आता निर्बंध शिथिल करण्यात आल्याने ‘पीएमपी’ची वाटचाल पहिल्या लॉकडाऊनपूर्वी असलेल्या दैनंदिन प्रवासी संख्येकडे व उत्पन्नाकडे होऊ लागलेली आहे. सध्या पीएमपीच्या दररोज सुमारे १ हजार ५४० पेक्षा जास्त बसेस मार्गावर धावत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी ‘पीएमपी’च्या बससेवेचा वापर करण्याचे आवाहन दत्तात्रय झेंडे यांनी केले आहे. प्रवाशांच्या सेवेत असलेल्या रातराणी, पुणे दर्शन व महिलांसाठी खास तेजस्विनी बससेवा या सर्व सेवा पूर्ववत सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच पीएमपीएमएलकडून मागील एक वर्षापासून ३० नवीन ग्रामीण मार्ग सुरू करण्यात आले आहेत.लॉकडाऊननंतर प्रवासी पीएमपी बस प्रवासाला प्राधान्य देत असून यामुळे दैनंदिन प्रवासी संख्येसह दैनंदिन उत्पन्नात वाढ होऊन पीएमपीची बससेवा पूर्वपदावर येत असल्याचे झेंडे यांनी सांगितले.