राज्यात महिलांवरील अत्याचारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच चिमुकल्या मुली देखील या अत्याचारांना बळी पडत आहेत. अशातच बापलेकीच्या अतूट नात्याला काळीमा फासणारी घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडली. जन्मदात्या वडिलांसह इतर चार जणांनी मुलीवर अत्याचार केले असून या सगळ्यांना अखेर अटक करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहराला हादरवून टाकणाऱ्या या घटनेबद्दल तेरा वर्षीय पीडित मुलीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या घरात युट्यूबवर व्हिडिओ पाहत असताना समाधाव लवटे नावाचा इसम तिथे आला. यानंतर तो पीडित मुलीला आपल्या घरी घेऊन गेला व व्हिडिओ प्रमाणेच सगळं काही मी तुझ्यासोबत करेन, असे म्हणत धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. घाबरलेल्या मुलीने याबद्दल घरी येऊन वडिलांना सांगितले. मात्र याबद्दल कोणाला काही कळाल्या आपली इज्जत जाईल, असे म्हणत वडिलांनी मुलीलाच गप्प राहायला सांगितले.
पुढे काही दिवसानंतर ही मुलगी आजारी असताना घरात झोपली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनीच तिच्यावर अत्याचार केले. मुलीने घाबरून विरोध केला असता, याबद्दल कोणाला काही सांगितल्यास तुझे तुकडे करेन, मारून टाकेन, अशा शब्दात तिला धमकी दिली. व शांत राहायला सांगितले. या दोन घटनांमुळे घाबरलेली मुलगी आणखी घाबरली जेव्हा तिच्या ट्युशन मधील शिक्षिकेच्या पतीनेच तिच्यावर अत्याचार केले. पुढे काही दिवसांनी ही मुलगी आपल्या आईच्या मैत्रिणीच्या घरी गेली असता तिच्या पतीने जबरदस्ती करत मुलीबरोबर अतिप्रसंग केला. तर तिच्याच दिराने मला तू खूप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, असं म्हणत तिच्यावर अत्याचार केले.
हा सगळा प्रकार 8 एप्रिल ते 29 जून 2024 या कालावधीमध्ये घडला. अखेर हे अत्याचार सहन न झाल्याने मुलीने चिखली पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व आरोपींना विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करत सर्व आरोपींना अटक केली आहे. पीडितेचे वडील, समाधान लवटे, प्रताप धायतडे, नितीन हराळे, सागर हराळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून पुढील तपास पोलीस करत आहेत.