परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या ‘द इंडिया वे’ चा अनुवाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार प्रकाशित

816 0

पुणे : परराष्ट्रमंत्री मा. श्री. एस. जयशंकर यांनी लिहिलेल्या ‘द इंडिया वे’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचा ‘भारत मार्ग’ या शीर्षकाने मराठीत अनुवाद करण्यात आला असून या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन मा. श्री. एस. जयशंकर यांच्या विशेष उपस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  देवेन्द्र फडणवीस ह्यांच्या हस्ते शनिवार, दि. २८ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या विदेश विभागाचे प्रभारी मा. श्री. विजय चौथाईवाले ह्यांची या वेळी विशेष उपस्थिती राहणार आहे. भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूडमधील मयूर कॉलनीतील म.ए.सो. ऑडिटोरियम येथे दु. ४.१५ वाजता हा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

२००८ सालच्या जागतिक आर्थिक संकटापासून सन २०२० च्या कोरोना महामारीपर्यंतच्या कालखंडात जागतिक व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन झाले आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांचे स्वरूप आणि त्याचे नियम बदलत आहेत. ‘जगातील सर्व प्रमुख शक्तींसोबत सर्वोत्तम संबंध” हे उद्दिष्ट उत्तमरित्या पुढे नेणे हा भारतासाठी त्याचा अर्थ आहे. त्यासाठी अधिक धाडसी आणि स्वतंत्र दृष्टिकोन देखील आवश्यक आहे. जागतिक उलथापालथीच्या या युगात भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत. भारत आघाडीची शक्ती बनण्याच्या मार्गावर आहे. ‘द इंडिया वे’ या पुस्तकामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री मा. श्री. एस. जयशंकर यांनी या आव्हानांचे विश्लेषण केले असून संभाव्य धोरणात्मक प्रतिसादांचे वर्णन केले आहे. जगाच्या व्यासपीठावर आपली महत्त्वपूर्ण जागा पुन्हा प्राप्त करू इच्छिणाऱ्या आपल्या सांस्कृतिक शक्तीसाठी योग्य असा आपला विचार ते, इतिहास आणि परंपरा यांचे संदर्भ लक्षात घेऊन त्यांनी मांडले आहेत.

‘द इंडिया वे’ ह्या पुस्तकाचा सरिता आठवले ह्यांनी मराठीत अनुवाद केला असून ‘भारत मार्ग’ ह्या शीर्षकाने हे पुस्तक भारतीय विचार साधना पुणे प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात येत आहे. मा. श्री. विजय चौथाईवाले ह्यांच्या सहकार्याने हा अनुवाद प्रकाशित करण्याची संधी ‘भाविसा’ला मिळाली आहे. भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन ही राष्ट्रीय विचारांनी पुस्तक प्रकाशन क्षेत्रात कार्यरत असणारी नामवंत संस्था आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली ख्यातनाम शिक्षण संस्था आहे. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर या द्रष्ट्या समाजधुरिणांनी १६२ वर्षापूर्वी म्हणजे देश पारतंत्र्यात असताना, स्वदेशी शिक्षणाची गरज ओळखून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. संस्था आजमितीस राज्यातील ७ जिल्ह्यात ७० हून अधिक शाखांच्या माध्यमातून पूर्वप्राथमिक शिक्षणापासून संशोधनापर्यंत दरवर्षी सुमारे ४० हजार विद्यार्थी शिक्षण देत आहेत.

या प्रकाशन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मा. श्री. एस. जयशंकर ह्यांचेबरोबर संवाद साधण्याची आणि आपले प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी असल्याने प्रवेशासाठी निमंत्रणपत्रिका आवश्यक आहे. ‘भारत मार्ग’ हे पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी वाचकांना सवलतीच्या दरात उपलब्ध राहणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!