शनिवारी रात्री उशिरा जिल्हा निहाय पालकमंत्र्यांच्या नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या असून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांची पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे या नियुक्त त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती केली आहे.
कसा आहे चंद्रकांत पाटील यांचा राजकीय प्रवास
चंद्रकांत पाटील मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातल्या खानापूर गावचे. पण, वडील गिरणी कामगार असल्यामुळे त्यांचं बालपण मुंबईत गेलं.
त्यांनी 13 वर्षं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केलं. पुढे अभाविपचे प्रदेश मंत्री, क्षेत्रीय संघटनमंत्री आणि अखिल भारतीय महामंत्री म्हणून काम केलं.
चंद्रकांत पाटील यांचे वडील बच्चू पाटील आणि आई गिरणी कामगार होते. त्यांचे वडील बच्चू पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गारगोटीनजीक असलेल्या खानापूर येथील आहेत. आई वडील गिरणी कामगार असल्याने चंद्रकांत पाटील यांचा जन्म प्रभूदास चाळ, रे रोड, मुंबई या ठिकाणी झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमध्येच झाले. शालेय शिक्षण त्यांचे राजा शिवाजी विद्यालयातून झाले, तर सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी बी.कॉमची पदवी प्राप्त केली.
चंद्रकांत पाटील हे २००४ मध्ये राजकारणात सक्रिय झाले. राजकारणात सक्रिय होताच २००४ ते २००७ या कालावधीमध्ये त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि दक्षिण महाराष्ट्र विभाग प्रमुख अशा दोन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या.
पश्चिम महाराष्ट्रात केलेल्या कामाचा ठसा तसेच पक्षपातळीवरील प्रवेशानंतर चार वर्ष केलेल्या कामाची पोचपावती चंद्रकांत पाटील यांना 2008 मध्ये मिळाली. भाजपकडून त्यांना पुणे शिक्षक पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर जाण्याची संधी मिळाली. त्यांच्या कामाची पोचपावती पक्षाने देत 2014 मध्येही याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा नेतृत्व करण्याची संधी दिली.
राज्यात 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर भाजप शिवसेनेची निवडणुकीनंतर युती झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले. या मंत्रिमंडळात चंद्रकांत पाटील यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला.
मंत्रिमंडळातील समावेशानंतर सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम विभागासारख्या महत्त्वाच्या खात्यांचा पदभार चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला. सार्वजानिक बांधकाम विभाग वगळून इतर दोन विभागांची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांनी ऑक्टोबर 2016 पर्यंत सांभाळली. यानंतर त्यांच्याकडे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली. 2014 ते 2019 पर्यंत त्यांनी महाराष्ट्रातील हे महत्त्वाचे कॅबिनेट मंत्रिपद यशस्वीरीत्या सांभाळले.
पुढे 2019 मध्ये त्यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.
आणि त्यानंतर 2022 मध्ये झालेल्या सत्तांतरामध्ये पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली असून सध्या त्यांच्याकडे राज्याचे उच्च तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.