कोंढवा येथील राजगृही बिझनेस हब कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्थेची इमारत युवराज ढमाले, विकी संघवी व इतर विकासकांनी बांधली आहे. येथील रहिवाशांना फ्लॅट दिला मात्र पार्किंग चा रॅम्प नसल्याने त्यांना पार्किंग वापरता येत नाही. तसेच पार्किंगच्या जागेत बेकायदेशिरपणे जिम व हॉटेलचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे महापालिकेने या बेकायदेशीर कामावर व महापालिकेची फसवणूक करणाऱ्या या विकासकांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुषार पाटील, माजी नगरसेवक शंकर पवार, राहुल भंडारे, पिंटू धाडवे यांनी केली आहे.
येथील बेकायदेशीर बांधकामाचा आणि हॉटेल व्यवसायाचा राजगृही सोसायटी मधील रहिवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. रविलाल प्रजापती यांनी या अगोदर याप्रकरणी तक्रार अर्ज देखील दिला होता. मात्र, महापालिकेने अद्याप त्यावर कारवाई केली नाही.
राजगृही बिझनेस हब कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्थेच्या इमारतीच्या समोर बांधलेल्या कमर्शियल इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर चारचाकी पार्किंगच्या जागेवर बेकायदेशीरपणे जिम सुरू केली आहे. तर, पाचव्या मजल्यावर दुचाकी पार्किंग असताना त्याजागी हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे.
कोंढवा बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 62/1/2/1 आणि 62/1/2/2 या जागेत हा राजगृही प्रकल्प आहे. या प्रकल्पावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी. तेथील स्थानिक रहिवाशांना या बेकायदेशीर कामामुळे होत असलेला त्रास लक्षात घेता ताबडतोब कारवाई होणे आवश्यक आहे. येत्या 2 ते 3 दिवसात कारवाई झाली नाही तर, आम्ही कायदेशीर मार्गाने आंदोलन करू, असा इशाराही तुषार पाटील, शंकर पवार, राहुल भंडारे व पिंटू धाडवे यांनी दिला आहे.
दरम्यान सोसायटीतील रहिवाशांनी आपली कुठल्याही प्रकारचे फसवणूक झाली नसून यामध्ये सोसायटीचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये असं लिखित पत्राद्वारे सांगितला आहे.