मुंबई- मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटकेत असलेले महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून सोमवारी तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी मलिक यांनी केली आहे.
23 फेब्रुवारी रोजी सक्तवसुली संचालयाकडून नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती मात्र हायकोर्टानं मलिक यांना दिलासा दिला नव्हता त्यामुळे नवाब मलिक यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण
मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत, असा आरोप 9 नोव्हेंबर 2021 रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मलिकांनी दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून जमीन खरेदी केलीय. या जमिनी मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपींच्या आहेत. मलिकांचे सरदार शाह वली खान आणि हसीना पारकर यांच्या जवळचा सलीम पटेलसोबत व्यावसायिक संबंध आहेत. या दोघांनी मलिकांच्या नातेवाईकांच्या एका कंपनीला मुंबईतील एलबीएस रोडवरची कोट्यवधींची जमीन कवडीमोल किमतीने विकलीय, असा आरोप फडणवीस यांनी केला होता. या व्यवहाराचे दाऊद इब्राहिमचा ईडी कस्टडीतील भाऊ इकबाल कासकरकडून पुरावे मिळाल्याचे समजते. या प्रकरणावरून नवाब मलिकांची अंडरवर्ल्डशी निगडित काही मालमत्ता आहे का, याची चौकशी ईडीने सुरू केली. त्यासाठी मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी पहाटेच चौकशीसाठी बोलावण्यात आलं. चौकशीनंतर दुपारी त्यांना अटक करण्यात आली.