नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून अरूणाचल प्रदेशच्या मुद्द्यावरून चीन भारताला वारंवार डिवचताना दिसत आहे, यामुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. यादरम्यान आता चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्ये सरकारने खोडसाळपणा केला आहे. त्यामुळे भारत सरकारनेदेखील एक मोठे पाऊल उचलले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
चीनने भारताच्या तीन वुशू खेळाडूंना देशात येण्याची परवानगी दिली नाही. त्याला कारण अरूणाचल प्रदेश. हे तीनही खेळाडू अरूणाचल प्रदेशचे आहेत. नयेमन वांगसू, ओनिलू तेगा आणि मेपुंग लामगू या तिघांना चीनने व्हिसा नाकारला आहे. हे तिन्ही खेळाडू अरूणाचल प्रदेशचे रहिवासी असल्याने चीनने मुद्दामहून व्हिसा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर भारतीय खेळाडूंना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या वसतिगृहात परत आणण्यात आलं. यानंतर भारताच्या क्रीडा मंत्रालयाने एक मोठे पाऊल उचलले आहे.
क्रीडा मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
चीनच्या खुरापतीनंतर आता क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी चीनचा दौरा रद्द केला आहे. आमच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचा अधिकार भारत सरकारकडे आहे, असं म्हणत परराष्ट्र मंत्रालयाने चीनला खडे बोल सुनावले आहेत. अरूणाचल प्रदेश आमच्या देशाचा भाग होता अन् नेहमी राहिल. रहिवासी किंवा जातीच्या आधारावर आमच्या नागरिकांशी असमान वागणूक भारत ठामपणे नाकारतो. चीनने आशियाई खेळांच्या भावना आणि आचार नियमांचं उल्लंघन केले आहे. सदस्य देशातील खेळाडूंशी भेदभाव केला जाऊ शकत नाही. आमच्या खेळाडूंविरोधात जोरदार काउंटर तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी दिली.