पुणे- मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे वसंत मोरे यांची पुढील भूमिका काय असणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची मनसेचे अजय शिंदे, बाबू वागस्कर आणि अनिल शिदोरे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. पक्षाच्या विरोधात भूमिका घेणे वसंत मोरे यांना महागात पडले आहे असे बोलले जात आहे.
एकूणच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची घडामोड असून या निर्णयाचे पडसाद आगामी महापालिका निवडणुकीत कसे उमटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच वसंत मोरे यांची पुढील भूमिका काय असणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.
‘अजान’ वक्तव्यावर वसंत मोरे यांची भूमिका
गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मनसे मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजानसाठी मशिदींवरील भोंग्यांवर आक्षेप घेतला. त्यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या मुद्द्यावरून मनसेतही अंतर्गत नाराजी निर्माण झाल्याचंही दिसून येत आहे. याच मुद्द्यावरुन आता मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘आमचे काही कार्यकर्ते उत्साही असतात त्यांनी हनुमान चालीसा लावली. मी माझ्या प्रभागात असे काही करणार नाही’, असं वसंत मोरे यांनी स्पष्टपणे सांगितलं.