मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर विक्रांतप्रकरणी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या अडचणीत आले आहेत. किरीट सोमय्या यांनी कारखान्याप्रश्नी ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तत्पूर्वी सोमय्यांनी आपल्या मुलुंड येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी ‘विक्रांतसाठी गोळा केलेला निधी कुठे गेला ?’ असा प्रश्न विचारताच सोमय्या यांनी पत्रकार परिषद गुंडाळली.
शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रांतच्या नावे घोटाळा केल्याचा पुनरुच्चार केला आहे. शिवसेना याप्रकरणी राज्यभरात निदर्शनं करणार असून दिल्लीतही संसदेत स्थगन प्रस्ताव देण्यात आला आहे. दरम्यान हा मनी लाँड्रिंगचा प्रकार असू शकतो असं संजय राऊत यांनी म्हटलं असून पीएमएलए कायद्यांतर्गंत कारवाईचं आव्हान ईडीला दिलं आहे. संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना किरीट सोमय्यांनी लगेच पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं. मात्र यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारताच सोमय्या उठून उभे राहिले आणि त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.
सोमय्या म्हणाले, ” अजूनपर्यंत संजय राऊत एक कागदही दाखवू शकले नाहीत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण एफआयआरची प्रत देत नाहीत. आम्ही एक दमडीचा घोटाळा केला नाही. माझं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना आव्हान आहे की, ५८ कोटी गोळा केले, कोणत्या चार बिल्डरकडे मनी लाँड्रिंग केलं हे संजय राऊतांनी सांगितलं असून ती माहिती जनतेसमोर ठेवावी. आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं असून घाबरत नाही. ठाकरे सरकारचे घोटाळे काढत असून काढतच राहणार”.
मात्र या निधीचे नेमके काय झाले या प्रश्नावर त्यांनी बोलणे टाळले. पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला असता सोमय्या त्यांच्या गाडीत बसले. तिथेही त्यांना प्रश्न केला असता त्यांनी गाडीची काच लावली.
निर्लज्ज माणूस, राऊतांचे ट्विट
सकाळी सोमय्या यांनी विक्रांतच्या निधीच्या प्रश्नावर काहीच न बोलता पळ काढला. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून सोमय्यांवर टीका केली आहे. किरीटजी… पैसे काय केले? उत्तर नाही. पत्रकार परिषदेतून पळून गेले. देशद्रोही. निर्लज्ज माणूस, अशी टीका राऊत यांनी केली आहे.