देशातील ७५ नागरी वन उद्यानांना पथदर्शक ठरलेल्या वारजे नागरी वन उद्यान प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा विकास करताना सामाजिक सहभाग वाढविणार असल्याची माहिती खासदार प्रकाश जावडेकर यांनी दिली.
वारजे नागरी वन उद्यानाच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जावडेकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक राजाभाऊ बराटे, आदीत्य माळवे, शिवराम मेंगडे, उपवनसंरक्षक राहुल पाटील, रोटरी क्लबचे डॉ. दीपक शिकारपुर यांची प्रमुख उपस्थिती होती. तेरी पॉलिसी सेंटरच्या वतीने संचालिका विनिता आपटे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
जावडेकर म्हणाले, ‘मी केंद्रात पर्यावरणमंत्री असताना पुण्यातील वन जमिनींच्या सद्यस्थितीची माहिती मागवली होती. ठिकठिकाणी वन जमिनींवर अतिक्रमण करण्यात होत होते. वारजे येथील वन जमिनीवरही अतिक्रमण सुरू झाले होते. या १६ हेक्टर जमिनीला कुंपण घालून संरक्षित केले. या ठिकाणी १५ फूट उंचीची सात हजारहून अधिक झाडे लावून ती वाढवली. पाण्याची सुविधा निर्माण केली. नागरिकांना बसण्यासाठी जागा आणि पायवाटा तयार केल्या. त्यामुळे उत्तम जंगल निर्माण झाले आहे.’
जावडेकर पुढे म्हणाले, ‘उद्यानाच्या दुसर्या टप्प्यात ४० एकर जागेत थिम फॉरेस्ट तयार करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, जैववैविध्यता संपन्नता वाढविणे, निसर्ग माहिती केंद्र, पर्यावरण जनजागृती, संरक्षण व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था, उद्योग आणि कंपन्या यांचा सामाजिक सहभाग वाढविणार आहोत. याच धर्तीवर देशात ७५ नागरी वन उद्याने विकसित केली जात असून, आगामी काळात २०० नागरी वन उद्याने विकसित करण्याचे नियोजन आहे.’
वारजे नागरी वन उद्यानाचा भाग म्हणून स्मृती उद्यान विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी शंभर नागरिकांनी आपल्या प्रिय जनांच्या स्मृती जतन करण्यासाठी शंभर झाडे लावली आहेत. या योजनेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, त्यासाठी एका झाडाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी दोन हजार रुपयांचा धनादेश ‘तेरी पॉलिसी सेंटर’च्या नावाने देण्याचे आवाहन विनिता आपटे यांनी केले.
वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करा
जावडेकर यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त ७१ झाडे लावण्यात आली. झाड वाढविणे हा वाढदिवसाचा गाभा असावा, त्यासाठी वाढदिवस एकतरी झाड लावून साजरा करण्याचे आवाहन जावडेकर यांनी यावेळी केले.