वाइनविक्री : निर्णयाच्या बाजूनं बोलताना…
काही देश पाण्याऐवजी वाइन पितात : अजित पवार
वाइन म्हणजे दारू नाही : संजय राऊत
पिणारा कुठेही जातोच ना : बाळासाहेब थोरात
वाइनविक्री : निर्णयाविरोधात बोलताना…
महाराष्ट्राची ‘मद्यराष्ट्रा’कडं वाटचाल : देवेंद्र फडणवीस
किराणा दुकानात आला दारूचा माल, लोकांचे होणार हाल : रामदास आठवले
उद्या ते असंही म्हणतील की, महिलाही पिल्या तरी चालतील : रावसाहेब दानवे
—————————-
राज्य सरकारनं द्राक्षे बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना मिळण्यासाठी मोठी किराणा दुकानं अथवा सुपरमार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आणि वाइन किती फायद्याची, ती कशी दारू नाही… अशी ‘झिंग झिंग झिंगाट’ करणारी विधानं पेल्यातून पेय उसळावं, तशी उसळू लागली. कुणी वाइन किती चांगली हे रिचावं म्हणून या निर्णयाच्या बाजूनं गळे काढू लागलंय तर कुणी वाइन किती वाईट
हे गळी उतरवण्यासाठी या निर्णया विरोधात गळे फाडू लागलंय.
वाइन पिऊन गाडी चालवली तर पोलीस बार दाखवतील की जेल ?
आता एक मजेदार किस्सा सांगतो… “वाइन म्हणजे दारू नाही. वाइनची विक्री वाढली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही हे केलं आहे. भाजपा फक्त विरोध करते पण शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही,” असं संजय राऊतांनी म्हटल्यावर एका नेट यूजरनं मुंबई पोलिसांना ट्विटरवर गमतीशीर प्रश्न विचारला “मी वाइन पिऊन गाडी चालवली तर मुंबई पोलीस मला जवळचा बार दाखवतील की तुरुंगात टाकतील ?” नेटकऱ्याच्या या प्रश्नाला मुंबई पोलिसांनीही तितकंच मजेशीर उत्तर दिलं. “सर, एक ‘जबाबदार नागरिक’ म्हणून तुम्ही मद्यधुंद अवस्थेत बारमधून उठून ड्रायव्हर असलेल्या गाडीत बसण्याची शिफारस करतो पण तुम्ही जर दारूच्या नशेत गाडी चालवलीत आणि ब्रेथलायझरमध्ये तुमच्या ड्रिंकमध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळलं तर तुम्हाला आमचा पाहुणा बनावं लागेल.”
वाईन विक्रीचा निर्णय म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला…
आता यातला विनोदाचा भाग सोडा पण वाइनच्या खुलेआम विक्रीच्या या सरकारी धोरणामुळं जनमानसांत अनेक प्रश्न उपस्थित झालेत. किराणा दुकानांत वाइनची विक्री हे रिचवणं जरा जडच वाटतंय. काही किराणा दुकानदार अथवा सुपर मार्केटचालकांना देखील हा निर्णय रुचलेला नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, ”आमच्या दुकानांत खरेदीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या ही पुरुषांच्या तुलनेत जास्त असते. किराणा मालाची खरेदी करता करता त्यांचं वाइनकडं लक्ष गेलं तर या दुकानांत दारूविक्री होते, असा समज करून त्या आमच्या दुकानांकडं पाठ फिरवतील शिवाय बहुतांश वेळा त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलं देखील असतात. त्यापैकी कुणी वाइन खरेदीचा हट्ट केलाच तर त्याचा सारा दोष आमच्या माथी लागेल. सरकारनं हा निर्णय करण्यापूर्वी जनतेचं वाइनबाबत पुरेसं प्रबोधन करणं गरजेचं होतं वगैरे वगैरे.” असे एक ना अनेक प्रश्न या वाइनमुळं निर्माण झालेत. त्यामुळं राज्य सरकारनं घेतलेला हा वाईन विक्रीचा निर्णय म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला, असा काहीसा प्रकार झालाय.
राज्यकर्त्यांच्या कुटुंबातील महिला वर्गास तरी हा निर्णय पटलाय का ?
किराणा दुकानं अथवा सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय कुणाला पटलाय अथवा न पटलाय हे थोडं बाजूला ठेवू… पण हा निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्यांच्या कुटुंबातील महिला वर्गास तरी तो पटला असेल का हो ? किराणा दुकानं अथवा सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याबाबतचा निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्यांनी एकदा तरी आपल्याच कुटुंबातील महिलांना याविषयी त्यांचं मत काय, हे नक्की विचारायला हवं. या निर्णयाचा महिला वर्ग, अल्पवयीन मुलं यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो, याचा निदान विचार तरी सरकारनं करायला हवा होता. हे सोडा, ज्या महिला आज राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत किमान त्यांनी तरी या निर्णयावरून सरकारला धारेवर धरायला हवं होतं.
असो, आता निर्णय झालाय. यापुढं किराणा दुकानं अथवा सुपरमार्केटमध्ये वाईन मिळणार. तीन पक्ष मिळून सरकार चालवत असलेल्या महाविकास आघाडीनं महाराष्ट्राच्या जनतेला या निर्णयाद्वारे जणू आवाहनचं केलंय… “वाइन बोले तो… ‘थ्री’ चिअर्स..!”
– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी