मुंबई – दररोज मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडणारे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मौनव्रत धारण केले आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेना नेते आणि त्यांच्या नातेवाईकांवर होत असलेल्या कारवाईवरुन शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. शिवसेना नेते आणि माजी स्थायी सभापती यशवंत जाधव यांच्या डायरीतील नोंदीवरूनही शिवसेना खासदार संजय राऊत यांना माध्यमांनी प्रश्न विचारले होते . त्यावर संजय राऊत यांनी जैन डायरीचा उल्लेख करत उत्तरही दिलं.
खासदार राऊत म्हणाले होते की , जाधव यांची डायरी जर विश्वासार्ह असेल तर यापूर्वी आलेल्या जैन डायरी व बिर्ला डायरी सुद्धा विश्वासार्ह मानून त्यात नमूद असलेल्या नेत्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. जैन डायरीच्या वेळी भाजपच्या नेत्यांची नावे उघड झाल्याबरोबर डायरीतील नोंदी विश्वासार्ह नसल्याचे सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन केले होते . एका डायरीला एक न्याय व दुसऱ्याला दुसरा न्याय, ही दुटप्पी भूमिका मान्य नाही.
कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता हैं… pic.twitter.com/nPT5N6LMTl
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 29, 2022
मात्र आता संजय राऊत यांनी मौन बाळगल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता हैं…’ यापुढे आपलं उत्तर हे मौन असणार असल्याचं सांगण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला आहे.