पुणे- पुणे महापालिकेवर प्रशासक नेमल्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या घेऊन कुणाकडे तक्रार करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या संदर्भात दाखले, पैसे भरण्याच्या सुविधांसह तक्रारींच्या निवारणासाठी महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालये सुरु करण्यात आली आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक समन्वयक अधिकारी नेमला जाणार आहे.
महापालिकेकडून एकूण 15 विविध विभागांतील सुविधा या सुविधा केंद्रातून दिल्या जातात. महापालिकेचा कार्यकाळ संपल्यापासून नागरिकांना उडवाउडवीची उत्तर दिली जात होती. याबाबत महापालिका प्रशासनाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन समन्वयक अधिकारी नेमण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.
या अधिकाऱ्यांमुळे महापालिकेला प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयावर नजर ठेवणे शक्य होणार आहे. हा अधिकारी या 15 विभागांशी समन्वय ठेवणार असून नागरिकांना येणाऱ्या अडचणी प्रत्यक्ष जागेवर सोडविल्या जाणार आहेत. याबरोबरच नागरिकांसाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर तक्रार पेटीही ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना थेट तक्रार करणे सुलभ होणार आहे.