पुणे- पीएमपीएमएलच्या वाहकाने एका 17 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीएमपीएमएलच्या स्वारगेट ते विश्रांतवाडी या मार्गावर ही घटना घडली. प्रशांत किसन गोडगे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. फिर्यादी तरुणीची स्वारगेट ते विश्रांतवाडी या मार्गावर बसने प्रवास करत असताना आरोपी गोडगे तिच्या बाजुला थांबला आणि मोठ्या आवाजात तिच्यावर ओरडला. मात्र फिर्यादी तरुणी काहीच न बोलता बाजूलाच उभी राहिली. दरम्यान, काही वेळानंतर बसमध्ये आलेल्या तिकीट चेकरकडे या तरुणीने वाहकाच्या वर्तनाविषयी तक्रार केली.
दरम्यान, तिकीट चेकर निघून गेल्यानंतर आरोपी वाहकाने राग मनात ठेवत तरुणीच्या कंबरेला हात लावला. तक्रारीनुसार, आरोपीने हा प्रकार तीन वेळेस केला. त्यानंतर घाबरलेल्या तरुणीने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल तक्रार नोंदवली. पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि त्या आरोपीला तातडीने अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.