नवी मुंबई- एनसीबी मुंबईचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांना मोठा दणका मिळाला आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांच्या नावावर असलेल्या नवी मुंबईतील बारचे लायसन्स रद्द केले आहे.
ठाण्याचे जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. राजेश नार्वेकर यांची याबाबत सहा पानी आदेश दिला आहे. यात वानखेडेंनी 1997 मध्ये बारचा परवाना घेताना खोटी कागदपत्रे सादर केल्याचे म्हटलं आहे. महाराष्ट्र प्रतिबंध कायद्याच्या कलम 54 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईतील क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केल्यानंतर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते.समीर वानखेडे हे अल्पवयीन असताना त्यांना बारचा परवाना देण्यात आला होता असा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बाजवली होती. बारचा परवाना मिळवण्यासाठी किमान वय 21 वर्षे आवश्यक आहे मात्र, असे असतानाही समीर वानखेडे यांना अल्पवयीन असताना बारचा परवाना मिळाला होता. या कारवाईमुळे समीर वानखेडेंना एक मोठा झटका बसला आहे.