पुणे- चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून पार्टी करण्याच्या बहाण्याने एका सहाय्यक अभिनेत्रीला बोलावून तिच्यावर दिग्दर्शकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित अभिनेत्री 17 वर्षांची असल्यापासून आजपर्यंत या दिग्दर्शकाने लैंगिक शोषण केल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे.
या प्रकरणी अमित प्रेमचंद सिटलानी ( वय ४० , रा . मधुबन सोसायटी , कळस ) याच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका २१ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित सिटलानी हा कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम करतो. पीडित तरुणी ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये दुय्यम कलाकार म्हणून काम करते. एका मित्राच्या ओळखीतून या दोघांची ओळख झाली होती. अमित सिटलानी याने पीडित तरुणीला मे 2017 मध्ये टिंगरेनंगर येथील मित्राच्या फ्लॅटवर पार्टी करण्यासाठी नेले.
या ठिकाणी त्याने पीडित तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. याचा अश्लिल व्हिडिओ बनवला होता. हा अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 2018 पासून त्याने पीडित तरुणीला वेगवेगळ्या हॉटेलवर बोलावून तिच्यावर बलात्कार केला असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. विश्रांतवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.