मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेयांची आज मंगळवारी संध्याकाळी ठाण्यात उत्तर सभा होत आहे. ठाण्यात ठिकठिकाणी राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा गाजणार असा अंदाज आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत राज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर आज ठाण्यात राज ठाकरेंची उत्तर सभा होत आहे.
राज ठाकरे यांनी यापूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी घेतलेल्या सभेमध्ये हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच त्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत देखील प्रश्न उपस्थित केला होता. यावरून विरोधकांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. राज ठाकरे हे आजच्या सभेमध्ये आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर देतील असा अंदाज बांधला जात आहे.
राजसाहेबांच्या गुढी पाडवा मेळाव्या नंतर ज्यांना "लावरे तो व्हिडीओ"ची खूप आठवण येत होती त्यांच्या साठी खास आजची #उत्तरसभा
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 12, 2022
पुन्हा ‘लाव रे तो व्हिडिओ’?
राज ठाकरेंची ६.३० वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन सर्कल येथे जाहीर सभा होणार आहे. सभेच्या आधी राज ठाकरेंच्या आवाजातील एक टीझरही मनसेकडून जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता या सभेच लाव रे तो व्हिडिओ पुन्हा ऐकायला मिळणार असल्यानं पुन्हा उत्सुकता वाढली आहे. संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करुन लाव रे तो व्हिडिओ पुन्हा ऐकायला मिळणार असल्याचं म्हटलं आहे. राजसाहेबांच्या गुढी पाडवा मेळाव्यानंतर ज्यांना लाव रे तो व्हिडिओची खूप आठवण येत होती त्यांच्यासाठी आजची सभा खास, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या आजच्या सभेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अधिकारी आणि कर्मचारी मिळून ४०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून सभेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग देखील पोलीस करणार आहेत. त्याचबरोबर ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सभेची जय्यत तयारी केली असून, राज यांच्या स्वागतासाठी ठाण्याच्या वेशीवरून दोनशे चारचाकी आणि एक हजार दुचाकीस्वारांची रॅलीदेखील काढण्यात येणार आहे.