पुणे- सारसबागेसमोर भीक मागून आपली गुजराण करत असलेल्या 70 वर्षाच्या ज्येष्ठ महिलेची करुण कहाणी एका भाविकांने आपुलकीने केलेल्या चौकशीमुळे उघड झाली आहे. पुणे महानगरपालिकेत काम करणाऱ्या एका अवैध सावकाराकडून या महिलेने 40 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्याबदल्यात तिने या सावकाराला दीड लाख रुपये परत दिले. परंतु हा सावकार अजूनही या वृद्धेला लुबाडत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सावकाराला आता पोलिसांनी अटक केली आहे.
दिलीप विजय वाघमारे (वय 52) असे अटक केलेल्या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक 70 वर्षीय ज्येष्ठ महिला काही दिवसांपासून सारसबागेसमोर भीक मागत होती. गणपती मंदिरात दररोज दर्शनासाठी येणाऱ्या एका भाविकाने एके दिवशी या महिलेची आपुलकीने विचारपूस केली. त्यातून हे धक्कादायक वास्तव समोर आले. पुणे महानगरपालिकेत काम करणाऱ्या दिलीप वाघमारे यांच्याकडून या ज्येष्ठ महिलेने नातीच्या उपचारासाठी 40 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्या बदल्यात तिने या सावकाराला दीड लाख रुपये परत दिले. परंतु तरीही वाघमारे याने पैशाच्या लोभापायी या महिलेचे एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून घेतले. दर महिन्याला येणारी पेन्शन देखील तो स्वतः काढून घेत होता. आणि प्रत्येक महिन्याला फक्त दीड ते दोन हजार रुपये या महिलेला देऊन बाकीचे जवळपास दहा हजार रुपये तो स्वतःकडे ठेवत होता.
अखेर पोट भरण्यासाठी या महिलेला सारसबागेसमोर भीक मागण्याची वेळ आली. त्यांना दोन मुली असून पतीचे बऱ्याच वर्षांपूर्वी निधन झालं आहे. त्या महापालिकेतून सफाई कामगार म्हणून निवृत्त झाल्या आहेत. पोलिसांनी वाघमारे यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्याकडे आणखी काही जणांची पासबुके सापडली आहेत. आरोपी वाघमारे हा महापालिकेत झाडू खात्यात नोकरीला आहे. आणखीन अशा काही नागरिकांना 10 टक्के व्याजाने पैसे देऊन तो व्याजाची वसुली करत होता. त्याने आणखी कोणाकडून अशा पद्धतीने पैसे येतोय का याचा तपास आता खडक पोलीस स्टेशन करत आहेत.