पुणे- महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये आज, बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ५ ठिकाणी बिघाड झाला. पुणे, पिंपरी-चिंचवड सहित ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे शहरातील कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता संपूर्ण शहरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. महत्वाचे दोन ४०० केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्र बंद असल्याने पर्यायी वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही असे महापारेषणच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान, महापारेषणचे सर्व वरिष्ठ अभियंता बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकेल . या कालावधीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे .