पणजी- गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सावंत यांनी कोंकणी भाषेत शपथ घेतली. राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सावंत यांच्यासोबत अन्य 8 आमदारांना देखील मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. सावंत सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.
आज सकाळी 11 वाजता प्रमोद सावंत यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह 10 भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते.
मोठ्या दिमाखात प्रमोद सावंत यांचा मुख्यमंत्रीपदाचा सोहळा आज संपन्न झाला. सावंत यांच्यासोबत अन्य 8 आमदारांना देखील मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. पाहुयात कोणत्या आठ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
1) विश्वजीत राणे
2) माविन गुदिन्हो
3) रवी नाईक
4) रोहन खंवटे
5) गोविंद गावडे
6) बाबूश मोन्सेरात
7) सुभाष शिरोडकर
8) नीलेश काब्राल
शपथविधी सोहळ्यापूर्वी पूजाअर्चा
प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळ्यासाठी भव्य स्टेज तयार करण्यात आला होता. त्यावर गोंय सरकार शपथविधी सुवाळो असं वाक्य लिहिलं होतं. या स्टेजच्या भोवती भव्य पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांचे फोटो होते. शपथविधी सोहळ्यापूर्वी डॉ. प्रमोद सावंत यांनी घरात पूजा अर्चा केली. प्रमोद सावंत यांनी मनोभावे कुलदैवतेला साकडे घातले. त्यानंतर ते शपथविधीसाठी घराबाहेर पडले.