पुणे- इंधनाच्या किमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे वाढत्या डिझेल दरवाढीचा फटका आता पीएमपीएमएल मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. डिझेल खरेदीचा खर्च वाढला असल्यामुळे पीएमपीच्या तिकीटात दरवाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यापूर्वीही आलेला दरवाढीचा प्रस्ताव संचालक मंडळाने फेटाळला होता. मात्र आता महापालिकेची मुदत संपली आहे. आयुक्त महापालिकेचे प्रशासक आहेत. त्यामुळे लवकरच पीएमपी प्रशासन आणि पालिका अधिकारी यांच्यात चर्चा होण्याची शक्यता असून यामध्ये तिकीट दरवाढ करायची की नाही यावर निर्णय होईल.
या बैठकीत तिकीट दरवाढीचा निर्णय झाला तर त्याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसू शकतो. पुण्यात सध्या दररोज दहा लाख पुणेकर बसने प्रवास करतात. त्यामुळे या 10 लाख पुणेकरांना या दरवाढीचा जास्त फटका बसू शकतो. दरवाढ झाल्यास ती पाच रुपयांनी होईल अशी देखील चर्चा आहे. त्यामुळे सध्या पालिकेवर प्रशासक असणारे आयुक्त याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.