पुणे- विमानतळाचे स्थलांतर अजिबात करणार नाही. याठिकाणीच प्रवाशांच्या सुविधेसाठी वाढ करण्यात येणार आहे, असे विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि खासदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आज सकाळी विमानतळ प्रशासन आणि खासदार गिरीश बापट यांच्याकडून नव्या विमानतळ टर्मिनलबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे विमानतळ हे प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे हे विमानतळ हलविण्याचा आमचा कोणताही विचार नाही असं गिरीश बापट यांनी यावेळी सांगितलं. तसेच विमानतळ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नव्या विमानतळ टर्मिनलची पत्रकारांना माहिती दिली. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर नव्या विमानतळाचे काम सुमारे ६८ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाल्याचे पाहायला मिळाले.