पुणे- पुण्यात एका १३ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओळख असल्याचा बहाणा करून एका अज्ञात व्यक्तीने पीडित विद्यार्थिनीला ढकलत एका नामांकित शाळेतील बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या माथेफिरु व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पीडित विद्यार्थिनी शाळेत गेली असताना सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या एक व्यक्ती शाळेत आला व त्याने या मुलीशी ओळख असल्याचा बहाणा करुन तिला ढकलत ढकलत शाळेच्या बाथरुममध्ये नेले. त्याठिकाणी तिचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कुणाला काही सांगितलेस तर बघ अशी धमकी देऊन तेथून निघून गेला. या प्रकरणी एका ४० वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे
या प्रकारानंतर या मुलीने आपल्या मैत्रिणीला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षिकांच्या कानावर ही घटना टाकली. त्यांनी मुलीच्या आईला व पोलिसांना बोलावून याची माहिती दिली. पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक मनिषा जाधव पुढील तपास करीत आहेत.