सिंधुदुर्ग – शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्याचा कट पुण्यात आखण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे तपासासाठी भाजप आमदार नितेश राणे यांना पुण्याला नेण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राणे हे पोलीस कोठडीत असून, त्यांना चौकशीसाठी आता कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष परब यांच्यावरील हल्ल्याचा कट पुण्यात शिजल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण या प्रकरणातील सचिन सातपुते याच्यासह चार आरोपी हे पुण्यातील चंदननगर, खराडी भागातील आहेत. यातून या प्रकरणाचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर सामनातून टीका झाल्यानंतर सामनाच्या कार्यालयावर दगडफेक झाल्याप्रकरणी सातपुते हा प्रमुख आरोपी होता. आता परब हल्ला प्रकरणाचा कट पुण्यात शिजल्याचे समोर येत असून, राणेंना तपासासाठी त्यांना पुण्याला नेले जाईल.
राणेंना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव सावंतवाडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. आज सकाळी त्यांना तेथून कणकवली पोलीस ठाण्यात आले आहे. तपास अधिकारी सचिन हुंदळेकर हे राणे आणि त्यांचा स्वीय सहाय्यक राकेश परब याची समोरासमोर चौकशी करीत आहेत.
नितेश राणेंनी स्वीय सहाय्यक राकेश परबच्या मोबाईलवरून हल्ल्यातील आरोपी सचिन सातपुते याच्याशी मोबाईलवरून संभाषण केले होते. त्यामुळे राकेश परब व नितेश राणे यांची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली होती. त्याला नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई, अॅड. उमेश सावंत यांनी आक्षेप घेतला. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.