मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात पुन्हा एक गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. सचिन वाझे यांना तुरुंगात विवस्त्र करून त्यांना शिवीगाळ केली जाते आणि त्यांच्यावर दबाव टाकला जातोय, असा आरोप परमबीर सिंह यांनी केलाय.
परमबीर सिंह यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सचिन वाझे मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत असताना त्यांच्यासोबत चर्चा केली होती. यावेळी पाटील यांनी सचिन वाझे यांच्यावर दबाव आणला होता. याबरोबरच उपायुक्त पाटील आणि वाझे यांच्यामध्ये चांदीवाल आयोगासंदर्भात एक गुप्त बैठकही झाली होती ”
परमबीर सिंह यांनी दिलेल्या जबाबानुसार अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात 30 नोव्हेंबर 2021 रोजी चांदीवाल आयोगाच्या सुनावणीवेळी भेट झाली होती.
परमबीर सिंह यांनी ईडीला दिलेला जबाब आरोपपत्रात नमूद करण्यात आलाय. “चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात वाझे आणि अनिल देशमुख यांची भेट झाली होती. त्यावेळी वाझे यांनी ईडीला दिलेला जबाब परत घ्यावा म्हणून देशमुख यांनी त्यांच्यावर दबाव टाकला होता. शिवाय या भेटीदरम्यान दोघांमध्ये चर्चा झाली होती, असा आरोपही परमबीर सिंह यांनी केलाय.