सांगली- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी सांगलीमध्ये भाजपच्या वतीने नाना पटोले यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पुन्हा आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यात संतापाची लाट उसळलेली आहे. पटोले यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभर भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. सांगलीतही पटोले यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत पटोले यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत हे पोस्टर फाडण्यात आले. नाना पटोले यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर पटोले यांनी माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.