मुंबई- बाबरीनंतर उत्तर हिंदुस्थानात शिवसेनेची एक लहर होती. उत्तरप्रदेश, हरयाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरपर्यंत आम्ही निवडणुका लढवल्या असत्या तर देशात शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता. असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. भाजपविरोधात आता शिवसेना महाराष्ट्राबाहेरही लढणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
बाबरीनंतर उत्तर हिंदुस्थानात शिवसेनेची एक लहर होती. उत्तरप्रदेश, हरयाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरपर्यंत आम्ही निवडणुका लढवल्या असत्या तर देशात आमचा पंतप्रधान झाला असता. पण आम्ही भाजपला मोकळीक दिली. भाजपला वाढवू दिलं. आम्ही महाराष्ट्रात काम केलं. हे बाळासाहेबांचं मोठेपण होतं. ते खरे हिंदुत्ववादी होते. एक हिंदुत्ववादी पार्टी वाढत असेल तर त्यांच्यात अडथळा आणू नये अशी त्यांची भूमिका होती, असं त्यांनी सांगितलं.
भाजपचं हिंदुत्व ड्युप्लिकेट आणि नकली आहे. सत्ता हवी असेल तरच त्यांना हिंदुत्व आठवते. पाकिस्तान, मुसलमान त्यांना आठवतात. काम झाल्यावर फेकून देतात. राजकीय गरज भागल्यावर ते इतरांना फेकून देतात. हा त्यांचा धर्म आहे, नीती आहे. पर्रिकर ते पार्सेकर आणि खडसेंचं काय झालं हे तुम्ही पाहिलं असेल. मुंडे कुटुंबाबत काय होत आहे हे तुम्ही पाहातच आहात. सर्व देशात हेच होत आहे. असं राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचं कालचं भाषण पाहूनच विरोधकांची झोप उडाली असेल. उद्धव ठाकरेंना बोलता येत नाही, चालता येत नाही, ते कुठे काम करत आहेत ? असा सवाल काल सकाळपर्यंत केला जात होता. काल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत चालत आले. त्यांनी तिथून शिवसेना, महाराष्ट्र आणि राष्ट्राला संबोधित केलं. तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या. वापरा आणि फेका असं भाजपचं हिंदुत्व आहे हे त्यांनी काल परखडपणे सांगितलं”
आम्हाला आमची ताकद माहीत आहे. आमचा आत्मविश्वास आम्हाला घेऊन जातो. आमचा केडरबेस पक्ष आहे. आमच्याशी टक्कर दिली तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. भाजपनं ईडी, आयटी, सीबीआयची वर्दी उतरवून मैदानात यावं; गाडल्याशिवाय राहणार नाही. ईडी असो, सीबीआय असो किंवा केंद्राची सत्ता असो तुम्ही कितीही आम्हाला चिरडण्याचा प्रयत्न करा, आम्ही घाबरणार नाही. आम्ही लढायला तयार आहोत, असा इशारा राऊत यांनी दिला.