उडुपी- कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात कॉलेजमध्ये हिजाब घालून येण्यावरून वाद चिघळला. त्यावरून कर्नाटकमध्ये आंदोलन उसळले. आता या वादामध्ये नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसूफझाई हिने उडी घेतली आहे.
याबाबत मलाला युसूफझाई हिने ट्विट करत म्हटले आहे की, “कॉलेज आम्हाला अभ्यास आणि हिजाब यापैकी एक निवडण्यास भाग पाडत आहे. मुलींना त्यांच्या हिजाबमध्ये शाळेत प्रवेश नाकारला जाणे हे भयावह आहे. कमी किंवा जास्त कपडे घातल्याने महिलांच्या वस्तुनिष्ठतेवर आक्षेप घेतला जात आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांकडे होत असलेले दुर्लक्ष थांबवले पाहिजे,”
काय आहे ‘हिजाब’ प्रकरण ?
कर्नाटक राज्यातील उडुपी जिल्ह्यातील मणिपाल येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये हिजाब (हेडस्कार्फ) महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत होता. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लिम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, मुलांचा एक गट हिजाब परिधान केलेल्या मुलींसोबत गैरवर्तन करताना दिसत होता. मात्र, सोशल मीडियावर या मुलींच्या बाजूने समर्थनाचा वर्षाव झाला. हिजाब घालण्याच्या अधिकाराच्या मागणीसाठी आपला विरोध सुरू ठेवण्याचा आग्रह धरणाऱ्या मुलीने सांगितले की तिला शिक्षकांचा पाठिंबा आहे आणि ज्या मुलांनी तिला भगव्या शालीत रोखले ते बाहेरचे होते.