अमरावती- अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने संतप्त झालेल्या रवी राणा समर्थकांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकून निषेध नोंदवला आहे. आज दुपारी ही घटना घडली. रवी राणा यांच्या महिला कार्यकर्त्यांनी पालिकेत येऊन जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या अंगावर थेट शाई फेकली.
पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर हे पालिकेच्या आवारात आज दुपारी अधिकारी आणि सुरक्षा रक्षकासोबत कचऱ्याची पाहणी करत होते. त्यावेळी हा प्रकार घडला. संतप्त झालेल्या रवी राणा समर्थकांनी आयुक्तांना पुतळा हटवल्याबाबत जाब विचारला. तेवढ्यात एका महिलेने आपल्या पिशवीतून एक बाटली काढली. त्यात काही तरी असल्याचं लक्षात आल्याने आष्टीकर सावध झाले.
आयुक्त एका रिक्षाच्या मागे जात असतानाच एका महिलेने त्यांना घेरले अन् सोबत आणलेल्या बाटलीमधील शाई आयुक्तांच्या अंगावर ओतली. सुरक्षा रक्षकाने त्वरित धाव घेऊन आयुक्तांना अक्षरशः मिठी मारून या महिलांपासून त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या महिला धावतच पळून गेल्या. जाताना या महिलांनी जय भवानी, जय शिवाजीचे नारे दिले. हा सर्व प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सर्व प्रकारात आयुक्त आष्टीकर आणि सुरक्षा रक्षकाचे कपडे शाईने माखून गेले.
यानंतर सुरक्षा रक्षकाने आयुक्त आष्टीकर यांना गाडीत बसवले. त्यानंतर आयुक्त आपल्या घरी गेले. मात्र, झाल्या प्रकारामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. या महिला आमदार रवी राणा यांच्या समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे. एकूणच या प्रकारामुळे पुतळा हटवण्याचं राजकारण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.