पुणे- घरफोडी आणि चोऱ्या करणाऱ्या अटकेतील चोरट्याने चक्क लॉकअपमधून धूम ठोकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना चाकण पोलीस ठाण्यात घडली आहे. फरार झालेल्या आरोपीला काही वेळातच पोलिसांनी पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर या चोरट्याने लॉकअपमधून कशा प्रकारे पलायन केले याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. ते पाहून पोलीस ठाण्यामधील लॉकअप बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कुणाल बाळू वीर असे आरोपीचे नाव आहे. आज सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास सगळे पोलीस त्यांच्या कामात दंग होते. तर पोलीस ठाण्यातील अंमलदार हे लघुशंकेसाठी बाहेर गेले होते. त्याचवेळी शरीराने सडपातळ असलेला कुणाल लॉकअपच्या दोन्ही गजांमधून सहजपणे बाहेर पडला अन काही कळायच्या आत त्याने धूम ठोकली.
कुणाल हा पसार झाल्याचं समजताच पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तिथूनच काही अंतरावर असणाऱ्या घरात तो होता. या घरातून पळ काढायच्या तो तयारीत होता. पण बाहेर चाकण पोलिसांनी सापळा रचून ठेवला असेल याची त्याला कल्पनाच नव्हती. तो पावणे दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडला अन् पुन्हा पोलिसांच्या तावडीत सापडला. त्यानंतर पोलिसांसमोर त्याने पलायनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. पण या घटनेमुळे पोलीस स्टेशनमधील लॉकअपबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.