पुणे- पुण्यात किडनी तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका विधवा महिलेच्या तक्रारीनंतर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेने पुणे शहरात किडनी तस्करी करणारे रॅकेट कार्यरत असल्याचे समोर आले आहे.
सारिका गंगाराम सुतार (मूळ रा. कोल्हापूर) या महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिका सुतार हिला दोन मुले आहेत. त्यापैकी तिचा एक मुलगा मुका असून तो बोलू शकत नाही. पती वारल्यानंतर सारिकाची परिस्थिती बेताची झाल्याने तिला खूप कर्ज झाले होते. त्यामुळे कर्जातून सुटका करण्यासाठी सारिकाने भोसले बाई या तिच्या मैत्रिणीकडे पैशांची मागणी केली. भोसले बाईंनी सारिकाची भेट रवी भाऊ नामक एका व्यक्तीशी करून दिली.
भोसले बाई आणि रवी भाऊने सारिकाचे अज्ञान आणि अशिक्षितपणाचा फायदा घेत तिला किडनी विकण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून सारिका आपली किडणी विकण्यास तयार झाली. त्यासाठी १५ लाख रुपयांत व्यवहार ठरला. रवी भाऊने सारिका सुतारचे सुजाता साळुंखे नावाने बनावट आधारकार्ड, पॅन कार्ड तयार करून तिला अमीत साळुंखे नावाच्या व्यक्तीची पत्नी म्हणुन दाखवले.
अमित साळुंखे याची किडनी फेल झाली असल्याने त्याची पत्नी सारिका सुतारची किडनी द्यावी असे सांगण्यात आले. ३१ मार्च २०२२ रोजी सारिका सुतारची एका हॉस्पिलमध्ये शस्त्रक्रिया करून तिची किडनी अमित साळुंखे याला ट्रान्सप्लांट करून लावण्यात आली. मात्र किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करूनही सारिकाला एकही पैसा देण्यात आला नाही.
सारिकाला आपली फसवणूक झाल्याचे कळताच, तिने हा सर्व प्रकार आपली बहीण कविता कोळी हिला सांगितला. बहिणीने रवी भाऊ याच्याशी संपर्क साधला असता त्याने १५ लाख रुपयाऐवजी चार लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. मात्र कविता कोळी यांनी सामजिक कार्यकर्ते जितेंद्र हगड यांच्या मदतीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.