पुणे- मावळ लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार तसेच हवेलीचे माजी आमदार गजानन बाबर (वय ७९) यांचे आज, बुधवारी दुपारी ३ वाजून २५ मिनीटांनी निधन झाले. पिंपरी-चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी राजश्री बाबर आणि २ मुले असा परिवार आहे.
बाबर यांना मागच्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
मुळचे सातारा जिल्ह्यातील असलेल्या गजानन बाबर यांनी १९९० साली वाई मतदारसंघातून विधानसभा लढविली होती. त्यावेळी त्यांना मदनराव पिसाळ यांच्या विरोधात २० हजार ५१७ मते मिळाली होती. त्यानंतर नव्वदच्या दशकात त्यांनी पिंपरी – चिंचवडच्या राजकारणात स्थान निर्माण केले होते. एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी ओळख मिळवली होती. पिंपरी चिंचवडमधील काळभोरनगर येथे शिवसेनेची पहिली शाखा देखील त्यांनीच सुरु केली होती, यानंतर पिंपरीमधील पारंपरिक प्रस्थ काळभोर यांना हादरा देत बाबर यांनी पहिल्यांदा भगवा फडकवला.
महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले. तत्कालीन हवेली विधानसभा मतदारसंघाचे बाबर यांनी सलग दोनवेळा विधिमंडळात प्रतिनिधित्व केले मावळ लोकसभा मतदारसंघाची 2009 मध्ये नव्याने निर्मिती झाली. शिवसेनेने बाबर यांना उमेदवारी दिली होती. बाबर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आझम पानसरे यांचा पराभव करत संसदेत प्रवेश केला.
दरम्यान , 2014 मध्ये लोकसभेला उमेदवारी नाकारल्यानंतर बाबर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता . 2017 मध्ये पिंपरी – चिंचवड महापालिका निवडणुकीदरम्यान बाबर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता . त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान बाबर यांनी पुन्हा घरवापसी करत शिवसेनेत प्रवेश केला होता.