ए बिड्डा, ए मेरा अड्डा…
फायर है मैं, झुकुंगा नहीं…
मी येतोय… आता सुट्टी न्हाय…
आता एकच लक्ष्य… नगरसेवक फिक्स…
——————–
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तिकडं प्रभाग रचना काय जाहीर झाली इकडं गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुकांची मांदियाळी सोशल मीडियावर गर्दी करू लागली… ‘अमुक तमुक प्रभागातून आपणच येणार निवडून’ या जोशात कैक जणांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. आपल्या फोटोसह एखादं स्लोगन टाकून ही इच्छुक मंडळी अमुक तमुक प्रभागात सध्या आपलीच ‘हवा’ असल्याचं सांगत सुटलेत.
आली रे आली आता माझी बारी आली…
आधी 11 आणि नंतर 23 अशी 34 गावं पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाली आणि ‘महापालिकेचा कारभारी आपणच’ असं म्हणणाऱ्यांच्या संख्येत आपसूक वाढ झाली. मागील (सन 2017) निवडणुकीच्या तुलनेत प्रभाग आणि नगरसेवक संख्या वाढल्यानं ‘पुण्याचा कारभारी’ होण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झालीये. नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांचे माजी सरपंच-उपसरपंच-ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्तेसुद्धा शड्डू ठोकून ‘आली रे आली आता माझी बारी आली,’ असं म्हणत निवडणुकीच्या रणांगणात आपलं नशीब आजमावण्यासाठी तयार झाले आहेत. ‘भाऊ तू लढ… 2022 चा फिक्स नगरसेवक तूच,’ अशी चावी फिरवून घोड्यावर बसवलेल्यांची संख्या देखील यात थोड्याफार प्रमाणात असणार हे नक्की ! काही इच्छुक मंडळी तर कधी आपलं गाव महापालिकेत जातंय आणि ‘मी गावचा कारभारी’ कधी एकदा ‘पुण्याचा कारभारी’ होतोय, याकडं कित्येक वर्षे डोळे लावून बसली होती. आता महापालिकेची झालेली हद्दवाढ आणि प्रभाग-नगरसेवकांची वाढलेली संख्या हा आयता मोका मिळताच या इच्छुकांनी अचूक टायमिंग साधलं. आता या इच्छुकांना कोणता पक्ष तिकीट देणार का हे अपक्ष लढणार ? बरं लढले तर लढले पण मग निवडून येणार की डिपॉझिट जप्त होणार ? या प्रश्नांची उत्तरं मिळायला अजून बरेच दिवस जावे लागतील पण तोवर या इच्छुकांच्या नावाची ‘हवा’ निवडणुकीच्या मैदानात मात्र रोज-दररोज नवनवीन रंग उधळत राहणार हेही नसे थोडके !
प्रभागांची स्थिती वाईट, विद्यमानांची हवा टाइट !
इकडं हे सारे इच्छुक फाइट देण्यासाठी सज्ज झाल्याचं चित्र दिसत असलं तरी तिकडं प्रभागांची स्थिती वाईट झाल्यानं विद्यमानांची हवा मात्र टाइट झाल्याचं दिसून येतंय. 58 प्रभाग आणि 173 नगरसेवक अशा भौगोलिकदृष्ट्या राज्यात सर्वांत मोठ्या ठरलेल्या महापालिकेच्या सभागृहातील बाकांवर बसण्यास कैक जण इच्छुक आहेत पण ज्यांनी पाच-पाच, दहा-दहा वर्षे या बाकावर बसण्याचा आनंद लुटला त्यांपैकी अनेक जणांच्या आनंदावर मात्र यंदा विरजण पडल्याचं दिसून येतंय. प्रभागांना दिलेला आडवा-उभा छेद आणि त्यांच्या तोडफोडीनं विद्यमानांना मात्र चांगलाच घाम फोडलाय.
जो प्रभाग आपल्यासाठी ‘सेफ’ होता तोच प्रभाग आता आपला ‘राजकीय गेम’ करेल की काय, असा प्रश्न अनेक विद्यमानांसमोर उभा ठाकलाय. इतकंच नव्हे तर यंदा आपल्यालाच तिकीट मिळणार, हे ठामपणे सांगणं देखील अनेकांना अवघड होऊन बसलंय.
कुठं जोडून ठेवलाय प्रभाग माझा..?
ज्या भागाशी काही संबंध नाही, अशा भागाशी प्रभाग जोडून किंवा ज्या भागात काम करण्याचा अथवा जनसंपर्क ठेवण्याचा संबंध आला नाही, अशा भागात उभं राहून कसं निवडून यायचं, याच उत्तर शोधता शोधता अनेकांच्या नाकीनऊ आले असणार. बरं, या नव्या प्रभाग रचनेकडं पाहाता आपल्यासमोर उभा राहणारा उमेदवार किती ताकदीचा आणि तयारीचा असेल याचा आडाखा बांधणं विद्यमानांना सध्या तरी कठीण होऊन बसलंय. त्यामुळं आपल्या विरोधात आपल्यापेक्षा वरचढ उमेदवार उभा राहिल्यास आपण निवडून येणार की घरी बसणार, या भीतीपोटी
अनेकांची झोप उडाली असणार. आपला जुना प्रभाग आणि आताची ही नवी प्रभाग रचना पाहून ‘कुठं जोडून ठेवलाय प्रभाग माझा..?’ असं म्हणत विद्यमानांनीही कपाळी हात मारून घेतला नसेल तरच नवल !
एकूणच काय तर पुणे महापालिकेची ही नवी प्रभाग रचना पाहाता यंदाची निवडणूक कुणासाठी पालिकेचा दरवाजा उघडेल आणि कुणाला घरचा रस्ता दाखवेल, हे सांगणं एखाद्या मुरब्बी राजकारण्याला किंवा एखाद्या मातब्बर राजकीय विश्लेषकालाही कठीण जाऊ शकेल.
– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी