मुंबईत काँग्रेस-भाजपमध्ये संघर्ष, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

213 0

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसमुळे कोरोना पसरल्याचं विधान संसदेत केलं होतं. या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने राज्यभरात भाजपच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी काँग्रेस जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. तत्पूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एकट्यानेच सागर निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी अक्षरशः मुसक्या आवळल्या.

देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आंदोलन करणार असल्याचा इशारा कालच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. त्यामुळे फडणवीसांच्या बंगल्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाजपनेही कॉंग्रेसच्या आंदोलनाला आक्रमक उत्तर देत आक्रमक पवित्रा घेतला आहे. सकाळी 11 वाजता हे आंदोलन असल्याने भाजपचे कार्यकर्तेही सागर बंगल्याबाहेर जमले. भाजप नेते प्रसाद लाड, कृपाशंकर सिंह, मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांच्यासह भाजपचे अनेक नेते फडणवीसांच्या बंगल्याबाहेर उभे आहेत.

सागर बंगल्यात येणाऱ्यांना त्यांचं ओळखपत्रं पाहून सोडलं जात आहे. या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाच काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एकट्यानेच सागरमध्ये शिरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सागर बंगल्यात जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. तेव्हा महाराष्ट्र द्रोही बीजेपीचा निषेध असो, अशा घोषणा लोंढे यांनी दिल्या. त्यावेळी ‘अरे या, गाडी घे ना’ असं म्हणत पोलिसांनी लोंढेंच्या खरोखरच मुसक्या आवळल्या. लोंढेंचे दोन्ही हात मागे पकडून पोलिसांनी त्यांच्या तोंडावर हात ठेवला होता. त्या अवस्थेतही लोंढे घोषणा देत होते. अखेर पोलिसांनी त्यांना गाडीत बसवलं आणि पोलीस स्टेशनकडे नेले.

काँग्रेस आंदोलनापूर्वी फडणवीसांच्या बंगल्याबाहेर पोहोचलेल्या भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांनी काही वेळापूर्वी धरपकड केली. नाना पटोले यांच्या बंगल्याबाहेरही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर, पुणे, औरंगाबादमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले. काँग्रेसच्या आजच्या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप हे देखील सहभागी होणार आहेत. तर, देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना उलटा प्रसाद देण्याचा इशारा भाजप नेत्यांनी केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. एकूणच राज्यात भाजप आणि कॉंग्रेसमधील संघर्ष वाढत असल्याचे दिसून येते आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!