मुंबई- इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा केली होती.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे आता दि. 1 एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार आहे. याचा फायदा ऑटोरिक्शा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे.
अजित पवार अर्थसंकल्पात म्हणाले होते की, युक्रेन आणि रशिया युद्धाचा साऱ्या जगावर परिणाम होईल. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार आहेत. या पार्श्वभूमीवर सीएनजीवरील मूल्यवर्धित कर साडेतेरा टक्क्यांवरून तीन टक्के करायचा प्रस्ताव त्यांनी अर्थसंकल्पात मांडला होता. या निर्णयामुळे सरकारचा 800 कोटींचा महसूल बुडेल. मात्र, सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार असल्याचे अजित पवार म्हणाले होते.
सीएनजीवरील व्हॅट कमी केल्याने प्रदूषणाला आळा बसणार आहे. आता येत्या एक एप्रिलपासून सीएनजीचे सुधारित दर लागू होणार आहेत. सीएनजीचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण येणार असून, आठशे कोटी रुपयांच्या महसूलाचा फटका बसणार आहे.