सातारा : राज्य सहकारी संस्थेचे सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदी पात्रात सापडून आला आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. एनडीआरएफ आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी 36 तास शोधकार्य केल्यानंतर अखेर शुक्रवारी सकाळी घोरपडे यांचा मृतदेह आढळून आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्य सहकारी संस्थेचे सहसंचालक शशिकांत घोरपडे ,वय वर्ष 50, राहणार गोखले नगर पुणे हे गुरुवारी दुपारपासून बेपत्ता होते. गुरुवारी शशिकांत घोरपडे त्यांचे मित्र प्रदीप मोहिते यांची कार घेऊन दुपारीच कार्यालयातून बाहेर पडले. नेहमीप्रमाणे साडेपाच वाजता ते घरी पोहोचले नाहीत त्यामुळे सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान त्यांच्या पत्नीने घोरपडे यांचा भाऊ श्रीकांत घोरपडे यांना विचारणा केली. फोन देखील बंद येत होता .
दरम्यान संध्याकाळी प्रदीप मोहिते यांना खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरून फास्टस्टॅगचा संदेश प्राप्त झाला, आणि त्यानंतर नातेवाईकांनी शोध घेतला असता शिंदेवाडी गावाच्या जवळ एका कंपनी समोर मोहिते यांना आपली कार सापडून आली. जवळच्या एका हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये घोरपडे यांनी चहा घेतल्याचे देखील दिसून आले. त्यानंतर निरा नदी पात्रालगत सीसीटीव्ही मध्ये एक व्यक्ती चालत पुलाकडे जात असल्याचे आढळून आले. आणि त्या व्यक्तीने नदीपात्रात उडी मारली हे दिसले.
तथापि नदीपात्रामध्ये नक्की कोणी उडी मारली हे स्पष्ट नव्हते, त्यानंतर एनडीआरएफ आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले. रात्री उशिरापर्यंत शोध कार्य करण्यात आले. हे शोधकार्य अखेर आज सकाळी थांबले. शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदीमध्ये सापडून आला आहे.