नवी दिल्ली- संसदेत भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे, तर काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे संख्याबळ पाच जागांपेक्षा कमी झाले आहे. राज्यसभेत भाजपने प्रथमच सदस्यसंख्येचा 100 चा टप्पा ओलांडला आहे. हा पराक्रम करणारा भाजप हा 1988 नंतरचा पहिला पक्ष ठरला आहे. गुरुवारी झालेल्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीच्या नुकत्याच झालेल्या फेरीनंतर भाजपाची संख्या आता 101 वर पोहोचली आहे.
गुरुवारी झालेल्या मतदानासाठी 13 पैकी चार जागांवर विजय मिळवत भाजपने ही कामगिरी केली. भाजपचा सहयोगी युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (UPPL) ने आसाममधून राज्यसभेची एक जागा जिंकली. आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांमधून भाजपने राज्यसभेच्या चार जागा जिंकल्या. या भागातून भाजपने वरिष्ठ सभागृहातील सदस्यांची संख्याही वाढवली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले की, “आसामने एनडीएच्या दोन उमेदवारांना राज्यसभेवर निवडून पंतप्रधानांवर विश्वास दाखवला आहे. भाजपच्या पवित्रा मार्गेरिटा 11 मतांनी तर यूपीपीएलच्या रावंगवरा नरझारी नऊ मतांनी विजयी झाल्या. विजेत्यांचे अभिनंदन’
राज्यसभेत भाजपने 100 चा आकडा पार केल्याने, या वर्षी ऑगस्टमध्ये होणाऱ्या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या शर्यतीतून विरोधक बाहेर पडले आहेत. आसाममधील राज्यसभेच्या दोन आणि त्रिपुरातील एका जागेसाठी गुरुवारी मतदान झाले. भाजपच्या उमेदवार आणि त्यांच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा एस. फांगनॉन कोन्याक नागालँडमधील एकमेव राज्यसभेच्या जागेवर बिनविरोध निवडून आल्याने संसदेच्या वरच्या सभागृहात स्थान मिळविणारी ती राज्यातील पहिली महिला ठरली. आसाममधील काँग्रेसच्या रिपुन बोरा आणि राणी नारा यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर, आपने राज्यातील पाचही जागा जिंकल्या. आता ‘आप’चे संख्याबळ वरिष्ठ सभागृहात आठ जागांवर पोहोचले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे संख्याबळ पाच जागांपेक्षा कमी झाले आहे.