सहजच्या भटकंतीमधे,नुकतीच, जेजुरी वाटेवरील सोनोरी गावच्या, सरदार पानसे यांच्या वाड्याला भेट दिली, तेव्हा पुन्हा एकदा, वास्तूच्या दुरावस्थेने, मनात काहूर माजले होते. सरदारांच्या त्या वाड्याच्या भव्य दरवाज्या जवळ पोहोचताच, वर्तमानाऐवजी भूतकाळातील सोनेरी दिवस माझ्या डोळ्या समोर येऊ लागले.
सरदार पानसे यांनी हा वाडा, साधारणपणे शके १६८२ ते १६८४ या दरम्यान बांधला. वाडा गावाच्या ईशान्य बाजूस असून किल्ल्यासारखा बांधला आहे. वाड्याची लांबी पूर्वपश्चिम ~३२५ फूट आणि दक्षिणोत्तर ~३८० फूट आहे. त्याची तटबंदी ९ फूट रूंद असून उंची १९ फूट आहे. वाड्याला अंबारीसह हत्ती आंत येतील असे दोन मोठे दरवाजे होते,जे आजही सुस्थितीत आहेत. वाड्यास सहा बुरुज आहेत. वाड्यात गणपतीचे, महादेवाचे,आणि लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे.
वाड्याच्या बाहेर, पेशव्यांच्या काळात तोफखाना प्रमुख असलेले सरदार भीवराव पानसे आणि त्यांच्या पत्नी सौ. उमा यांची समाधी आहे. सद्यःस्थितीत, वाड्याचे भग्न अवशेष पहाताना, मी मात्र, सुवर्णकाळातील इतिहासात रमून गेलो होतो.
सरदार आणि मनसबदारांचे वाडे म्हणजे मानसन्मान,रीती रिवाज,सुबत्ता, नोकरचाकर, हत्ती घोडे, पालखी मेणे, सणावारांचा जल्लोष क्वचित रणभूमीचे नारे,सीमोल्ल॔घन . . . .असे सर्व काही ओघानेच येते ! पण उध्वस्ततेच्या वाटेवर, अवकळा आलेली तीच वास्तू पहाताना, मन मात्र विदीर्ण होऊन जाते.
इतिहासाच्या पाउलखुणा जपणे, ही सार्वकालिक गरज वाटते, परंतू कालपरत्वे, वैभवाचे विस्मरण, नव्या पिढ्यांची उदासीनता, हेवेदावे, आर्थिक चणचण आंणि बदलते जनमानस, अशा अनेक कारणांमुळे, वास्तूवैभवाची उपेक्षा आणि शोकांतिका, जाणून घेतली. परिवर्तन अटळ असते परंतू दीव्यत्वाचा विसर पडणे हे कोणाच्याही हिताचे नसते, हे मान्य करावेच लागते !
सोनोरी गावाच्या सोनेरी इतिहासाची उजळणी होताना, हाच विचार, मनामधे ठामपणे येत होता !
– आनंद सराफ
छायाचित्रे
सुरेश तरलगट्टी