पुणे- ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट (वय 78) यांचं पुण्यात राहत्या घरी निधन झालं. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पत्रकार, साहित्यिक, समाजसेवा, व्यसनमुक्ती अशा विविध क्षेत्रात त्यांनी काम करून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार आहे.
डॉ. अनिल अवचट यांची वास्तववादी लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुक्तांगण या संस्थेचे संस्थापक म्हणून ओळख होती. अनिल अवचट गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर आधी येथील संचेती रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांनी पत्रकार नगर येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
अवचट यांनी पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकशास्त्राची पदवी घेतली होती. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच बीजेमधील मित्र डॉ. कुमार सप्तर्षी आणि डॉ. जब्बार पटेलांसारख्या मित्रांसोबत सामाजिक जागृती, विकास आणि क्रांती या विषयावर त्यांच्या चर्चा चालायच्या. त्यातूनच त्यांची जडणघडण झाली. पुढे या तिन्ही मित्रांनी डॉक्टरीपेक्षा सोडून कला, समाजसेवा आणि राजकीय क्षेत्रात स्वत:ला झोकून दिलं. अवचट यांनी लेखन आणि समाजसेवेला वाहून घेतले होते.
त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली होती. तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केली होती.