पुणे- ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, प्रवचनकार डॉ. सच्चीदानंद शेवडे लिखित ‘डावी विषवल्ली’ या पुस्तकाचं प्रकाशन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं. यावेळी डॉ. सचिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशपांडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेवक अॅड. प्रसन्न जगताप, जयंत भावे, श्रीकांत जगताप, आर पी आय चे राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी, ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “डाव्यांनी सतत खोटे बोलून देशाच्या युवा पिढीचे मेंदू पोखरायचे काम केले. अशा पुस्तकांमुळे डाव्यांचा खोटारडेपणा उघडा पडला असून सातत्याने सांगितलेले कसे खोटे आणि चुकीचे होते हे आता नव्या पिढीला पटतंय. त्यामुळेच देशभरातून डावे हद्दपार होत असल्याचे दिसते. असे असले तरी अर्बन नक्षलवादाच्या भूमिकेतून डावे सतत देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून या परिस्थितीचा विचार करणे गरजेचे आहे”
माधव भांडारी म्हणाले, “डाव्यांना जनतेच्या प्रश्नांना खितपत ठेवण्यात रस आहे. गरीब हा नेहमी गरीबच राहावा त्याच्या उद्धाराचा विचार डावी विचारसरणी कधीच करत नाही त्यामुळेच देशभरातील जनतेने डाव्या विचारसरणीला नाकारले आहे”
डॉ. सच्चीदानंद शेवडे म्हणाले की या पुस्तकाचे मूळ लेखक डॉ राजीव मिश्रा असून याचा मराठी अनुवाद केला आहे. या माध्यमातून डाव्यांचा काळा इतिहास मराठी जनतेसमोर मांडण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.
नावीन्य प्रकाशनच्या वतीने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाचं आयोजन परशुराम सेवा संघाच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऋषिकेश सुमंत, स्वप्नील कुलकर्णी, दत्तात्रय कुलकर्णी, शिवप्रसाद मुळे, सागर मांडके, मंदार डबीर, माधुरी कुलकर्णी, संकेत जोशी, ज्योती पाठक, ऋषिकेश गालफडे, अभिषेक समुद्र, कांचन कुलकर्णी, राहुल होशिंग, आशिष गोडबोले आदींनी परिश्रम घेतले.