इंद्रायणी नदी पात्रातील अनधिकृत बंगले कायमचे जमीन दोस्त करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. त्यामुळे आता हे बंगले महानगरपालिकेकडून पाडण्यात येणार आहेत. यामध्ये एक-दोन नाही तर तब्बल 29 बंगले पाडले जाणार आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
पिंपरी चिंचवड मधून इंद्रायणी नदी वाहते. याच इंद्रायणीच्या काठावर असलेल्या चिखली परिसरात नदीच्या पात्राजवळ म्हणजेच ब्लू लाईनमध्ये जरे वर्ल्ड बिल्डर या विकासकाने ओपन बंगलो प्लॉट विक्रीस काढले होते. अनेक ग्राहकांनी हे प्लॉट विकत घेऊन पाटबंधारे विभागाचे, पर्यावरण विभागाचे आणि महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसून तब्बल 29 आलिशान बंगले या ठिकाणी उभारले. या अनधिकृत बंगल्यान विरोधात पर्यावरण प्रेमी वकील तानाजी गंभीरे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली होती. त्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने हे बंगले जमीनदोस्त करण्याचा निर्णय दिला त्याचबरोबर बंगल्यांचा राडारोडा साफ करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा दंड विकसकाला ठोठावला होता.
या निर्णयाच्या विरोधात संबंधित विकसक आणि बंगले धारक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारत राष्ट्रीय हरित लवादाचा निर्णय कायम ठेवत हे बंगले पाडण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून हे बंगले जमीन दोस्त केले जाणार आहेत.