पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक मंदिरांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. कधी मंदिरातील दानपेटी तर कधी देवाचे दागिने, मुकुट याच्यावर डल्ला मारल्याचं आढळून आलं आहे. या चोरांना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून पारगाव मधील मंदिरात देखील अशी चोरी झाली होती. त्याप्रकरणी तपास करत असताना एका सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच 10 ते 11 मंदिरांमध्ये चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. विविध मंदिरात चोरी केलेला जवळपास चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी माहिती दिली.
विनायक जिते (रा. कान्हूर मेसाई ता.शिरुर जि.पुणे) नावाच्या इसमाला पारगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पारगाव मधील मंदिरातील चोरीच्या गुन्हयाचा तपास करत असताना गेले काही महिन्यापासून वेगवेगळया पोलीस ठाणे हद्दीत जावुन मंदीर चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशईत इसम चोरी करत असल्याचे आढळुन आला. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर हा इसम विनायक असल्याचे आढळून आले. आरोपी विनायक हा शिकापुर येथे येणार असल्याची गोपनीय माहीती मिळाली पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याला मंदिर चोरी बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय अधिक बळावला. मात्र कसून चौकशी केली असता मंदिर चोरीची कबुली त्याने दिली. त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. कोठारीत असताना त्याची चौकशी केली असता त्याने शिंगवे येथील भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर, लाखणगाव येथील देवीचे मंदीर, मांदळेवाडी येथील हनुमान मंदीर, जारकरवाडी येथील बोल्हाई मातेचे मंदीर, शिकापुर येथील राउतवाडी येथील श्रीनाथ मस्कोबा मंदीर, शिकापूर येथील कवटेमळा येथील वडजाई माता मंदिर, खेड राजगुरूनगर येथील कन्हेरसर येमाई जुने ठाणे मंदिर, शिरूर सविंदणे येथील काळूबाई मंदीर, रांजणगाव फंडवस्ती येथील तुकाई माता देवीचे मंदिर, घोडेगाव शिंदेवाडी येथील खंडोबा मंदीर व कळंमजाई मंदीर, तसेच अहमदनगर जिल्हयातील सुपा येथील तुकाई मंदीर वाडेगव्हाण पारनेर व नगर एम.आय.डी.सी. येथील श्री. खंडोबा मंदिर शिव मल्हारगड, पिंपळगाव माळी इत्यादी ठिकाणी रात्रीच्या वेळी मंदिरात चोऱ्या केल्याची कबुली दिली.
आरोपीकडून १,६३,०००/- रु किंमतीचे सोन्याचे दागिने, १,१७,०००/- रु किंमतीचे चांदी मुखवटे व पितळी धातूच्या वस्तु, ८०,०००/- रु व किंमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य व ३२०००/- रु रोख रक्कम असा जवळपास चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.