अजित पवार-शरद पवारांनी बंद दाराआड काय चर्चा केली ?

555 0

पुणे । वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आज पार पडली. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आल्याचं बोललं जातंय. मात्र मागील काही दिवसांपासून काका-पुतण्यांमधील संबंध सुधारत असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी देखील अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं यासाठी विठुरायाकडे साकडं घातलं होतं. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमधील दरी कमी झाल्याचं बोललं जात आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेनिमित्ताने अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवारांनी घाई घाईने शरद पवारांच्या दालनात प्रवेश केला. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात अजित पवार ‘प्रेसिडेंट’ असं लिहिलेल्या खोलीत शिरताना दिसत आहे. घाईघाईत त्यांनी पीएसोबत केलेला संवाद देखील समोर आला आहे. संबंधित व्हिडीओत अजित पवार घाईघाईत चालत येताना दिसत आहेत. आल्यानंतर ते ‘कुठे बसायचं रे’ असं पीएला विचारताना दिसत आहेत. यावर ‘साहेब इकडे आत बसलेत’ असं पीएने सांगितल्यावर अजित पवार प्रेसिडेंट बोर्ड लावलेल्या दरवाज्यातून आतमध्ये शिरले. यानंतर याच दालनात दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेने राजकीय वर्तुळात मोठया चर्चेला उधाण आलंय. खरं तर गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. अलीकडेच शरद पवार आणि अजित पवार एका मंचावर दिसले होते. बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार काका पुतणे एकत्र आले होते. यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील, अशी चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, त्याच मंच्यावर खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातही संवाद झाला होता. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या खुर्च्या एकमेकांशेजारी होत्या. त्यामुळे दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या अनुषंगाने ती मोठी घडामोड मानली जात होती. आणि त्यांनतर आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील बंद दाराआड चर्चा झाल्याने हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे.

 

Share This News
error: Content is protected !!