पुणे । भारतातील कानाकोपर्यातून भाविक भक्त प्रयागराज म्हणजे महाकुंभ मेळ्यासाठी जात असतात.विशेष बाब म्हणजे पुणे शहरातील शनिवार पेठेत रहात असलेले ७२ वर्षे वयाचे सुर्यकांत तुकाराम साखरे आणि रजनी सुर्यकांत साखरे या दांपत्याने पुणे ते प्रयागराज असा ३५१० किलोमीटरचा प्रवास सलग २४ दिवसात दुचाकीवरून पूर्ण केला. यावेळी पुणे ते शनिशिंगणापूर, शिर्डी, उजैन, चित्रकूट, प्रयागराज, काशी व अयोध्या या मार्गाने धार्मिक स्थळांना भेटी देऊन त्यांनी हा प्रवास सहज पूर्ण केला. भक्ती आणि श्रध्देचे एक उत्तम उदाहरण म्हणून या दांपत्याकडे पाहिले पाहिजे.
त्यांनी केलेल्या अद्भूत प्रवासाचा गौरव म्हणून सुर्यकांत तुकाराम साखरे आणि रजनी सुर्यकांत साखरे यांच्या या विलक्षण प्रवासाचा अनुभव मांडणारा आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करणारा गौरव सोहळा सर्व साखरे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि अनिरूध्द येवले यांनी आयोजित केला होता. याप्रसंगी आपले अनुभव कथन करताना सुर्यकांत तुकाराम साखरे म्हणाले, तीन-चार वर्षांपूर्वी माझ्या मनात होते, की आपण काशी यात्रेला जाऊन यावे परंतू योगायोगान प्रयागराजला महाकुंभ मेळा होणार आहे. मग आम्ही मनात दृढ निश्चय केला. आपल्याला दुचाकीवरून कुंभमेळ्याला जायचे आहे. आणि प्रवासाला सुरूवात केली. आम्ही प्रथम पुणे ते शिर्डी प्रवास करून साईंचे दर्शन घेऊन पुढे निघालो. आम्हाला पुढील मार्ग सुकर होत गेला. वाटेत अनेक अडचणी आल्या त्याच्यावर आम्ही मात करत महाकुंभमेळ्यात सहभागी होताच शिण-भाग जाऊन आनंद वाटला. आम्हाला विलक्षण अनुभूती मिळाली.
आत्मविश्वास, जिद्द, प्रेम, काळजी, आपुलकी, परमेश्वरावरची निस्सिम भक्ती या सर्वांचा अनोखा संगम या कार्यक्रमात होता. कार्यक्रमाला प्रसिद्ध शिवव्याख्याते पराग ठाकूर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने त्याचबरोबर सर्व साखरे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होते.सूर्यकांत साखरे आणि रजनी साखरे यांच्या मुलाखतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनी आपल्या प्रवासाचा, त्यात आलेल्या विविध अनुभवांचा, अडी-अडचणींचा आणि आध्यात्मिक प्रचिती त्यातून सुखरूपपणे झालेल्या त्यांच्या प्रवासाचा संपूर्ण इतिवृत्तांत यावेळी उपस्थितांसमोर मांडला. पराग ठाकूर आणि महेश सूर्यवंशी यांनी साखरे दांपत्याच्या जिद्दीचे, धाडसाचे आणि त्यांच्या कुटुंबाने या प्रवासात त्यांना जी साथ दिली त्याचे कौतुक केले. श्रीधर साखरे यांनी आपल्या मनोगतातून आई-वडिलांच्या प्रति असलेली काळजी आणि कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एसीपी मनिषा झेंडे यांनी केले. मुलाखत प्राची एक्के यांनी घेतली. तर कार्यक्रमाचे नियोजन अनिरुध्द येवले यांनी केले.