पुणे: सर्वोच्च न्यायालयाने नुकताच अनुसूचीतील जातीमध्ये वर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाचे मातंग समाज स्वागत करीत आहे .आता राज्य सरकारने जातनिहाय जनगणना करुन सर्वच समाजाच्या आरक्षणाचा तिढा सोडवावा .तसेच अनुसुचित जातीत लवकरात लवकर अबकड वर्गवारी करावी अन्यथा लाखोंच्या संख्येने मातंग समाज लाँग मार्च काढून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक व माजी मंत्री रमेश बागवे यांनी दिला आहे .सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते .
पुढे ते म्हणाले की ,आता समाजाने सर्व मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे आणि यापुढचा लढा उभारला पाहिजे असे मातंग समाजाला त्यांनी आवाहन केले .
सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन मोठा दिलासा दिला आहे परंतु आता समाजाने आणि संघटनांनी एकत्र येऊन याची अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल .असे मत जेष्ठ विधीतज्ञ अँड. एकनाथ सुगावकर यांनी मांडले
क्रिमिलेअरचा जो निर्णय आहे तो अनुसूचीत जातीला लागू होत नाही कारण अनुसूचित जातीचे आरक्षण हे आर्थिक मागसलेपणामुळे नाही तर सामाजिक अस्पुषतेमुळे मिळाले आहे त्यामुळे मातंग समाजाने क्रिमिलेअर बाबत विरोध केला पाहिजे असे मत सत्यशोधक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे यांनी व्यक्त केले .
आम्ही गेली सोळा वर्ष महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्या ,शाळा ,महाविद्यालय ,राज्यसेवा व लोकसेवा तसेच जिथे आरक्षण आहे अशा सर्व ठिकाणचा लाभ घेणाऱ्या अनुसुचित जातीतील विविध जातीचे प्रमाण पुराव्यासहित आमच्याकडे आहे .यामध्ये मातंग समाजाला अत्यंत नगण्य प्रमाणात लाभ मिळाला आहे असे अबकड आरक्षणासाठी आंदोलन करणारे लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णुभाऊ कसबे यांनी व्यक्त केले .
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा कोणा एका जातीसाठी नसून अनुसूचित जातीतील ५९ जातीसाठी आहे .यामुळे ज्यांना खरच आरक्षण मिळाले नाही त्या उपेक्षित जातीना आता न्याय मिळणार आहे असे मत झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवानराव वैराट यांनी यावेळी व्यक्त केले .
यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक भगवान वैराट ,माजी नगरसेवक अविनाश बागवे ,लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक आंदोलक नेते विष्णूभाऊ कसबे ,सत्यशोधक पक्षाचे सचिन बगाडे,अनिल हतागाळे ,जेष्ठ सामाजिक नेते अंकल सोनवणे ,अँड.एकनाथ सुगावकर ,दलित स्वंयसेवक संघाचे नेते राजाभाऊ धडे, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे माजी अध्यक्ष विजय डाकले ,निलेश वाघमारे ,लोकजनशक्तीचे संजय आल्हाट, भाजपा अनुसूचित मोर्चाचे सुखदेव अडागळे ,पुणे शहरातील सर्व राजकीय पक्षाचे व विविध संघटनांचे प्रमुख नेते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .